Navratri2024 Shri Sukt Path: नवरात्रोत्सवात आदिशक्तीची उपासना करताना श्रीसूक्त पठण करताय? जाणून घ्या याचे महत्त्व...

Navratri2024 Shri Sukt Path: नवरात्रोत्सवात आदिशक्तीची उपासना करताना श्रीसूक्त पठण करताय? जाणून घ्या याचे महत्त्व...

नवरात्रात आदिशक्तीची उपासना करताना श्रीसूक्त पठण करतात. आज आपण तीन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या श्रीसूक्ताविषयी माहिती करून घेऊया. श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात समाविष्ट केलेले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।

नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम् ।।

नवरात्रात आदिशक्तीची उपासना करताना श्रीसूक्त पठण करतात. आज आपण तीन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या श्रीसूक्ताविषयी माहिती करून घेऊया. श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात समाविष्ट केलेले आहे. याला ‘ खिलसूक्त ‘ असेही म्हणतात. श्रीसूक्तामध्ये पंधरा ऋचा आहेत. सोळावी ऋचा ही फलश्रुतीची आहे. श्रीसूक्ताला जोडूनच फलश्रुती म्हणून लक्ष्मीसूक्त म्हणण्याची प्रथा आहे. श्रीसूक्ताचे रचनाकार आनंद, कर्दम, चिक्लित, इंदिरासुत असे ऋषी आहेत. श्री आणि अग्नी या सूक्ताच्या देवता आहेत. श्रीसूक्ताचा उपयोग जपासाठीही करतात.

सर्व देवता वास्तव्याला आकाशात असतात असा प्राचीनकाळापासून भाविकांचा विश्वास होता. म्हणून यज्ञामध्ये देवतेला अर्पण केलेला हविर्भाग अग्नीच्या माध्यमातून देवतेपर्यंत पोहोचतो असा भक्तांचा विश्वास असल्याने अग्नीच्या माध्यमातून श्रीदेवतेपर्यंत पोचता येईल असा विश्वास त्यांना वाटत होता. म्हणून सूक्ताचे रचनाकर्ते स्वत: अग्नीला म्हणजेच जातवेदला सतत प्रार्थना करीत आहेत . " हे जातवेद, सोन्यासारखा कांतिमान,मनोहर, सोन्याचांदीच्या माळा घातलेल्या , आल्हाद देणार्या सुवर्णमय अशा लक्ष्मींला माझ्यासाठी आवाहन कर. हे अग्ने , ज्या लक्ष्मीच्या योगाने मला सुवर्ण , धन , अश्व, गोधन व सेवक आदिसंपदा मिळेल त्या अविनाशी व स्थिर अशा लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. जिच्या मध्यवर्ती रथापुढे घोडे चालत आहेत व हत्तीच्या चित्कारांनी जिचे अस्तित्त्व समजते अशा लक्ष्मीदेवीला मी आवाहन करीत आहे. श्री देवी माझ्यावर कृपा करो.

जिच्या स्वरुपाचे वर्णन करता येत नाही. जी स्मित हास्य करते , जिचे घर सुवर्णाचे आहे, जी दयाळू , तेजस्वी, संतुष्ट आहे व जी संतोष देते, जिची वसती कमळात असते व जिची कांतीही कमळासारखी आहे अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो. जी चंद्राप्रमाणे तेजस्वी,आल्हाद देणारी, कीर्तिवान, उज्ज्वल आहे. देव जिची सेवा करतात जी उदार आहे, जी कमल धारण करते हे त्या लक्ष्मीला मी शरण आलो आहे. माझे दारिद्र्य नष्ट होवो अशी मी तुला प्रार्थना करतो. सूर्याइतकी तेजस्वी कान्ती असणार्या हे लक्ष्मी , तुझ्या तपामुळे बेल वृक्षाला वनाचा राजा म्हणून मान्यता मिळाली . माझ्या तपाचे फळ म्हणून ही त्याची फळे माझ्या मनातील दैन्य व बाह्य दारिद्र्य दूर करोत. हे लक्ष्मी , कुबेर व मणिभद्र हे मजकडे कीर्तीसह येवोत. या श्रेष्ठ राष्ट्रांत मी जन्माला आलो आहे. तो कुबेर मला कीर्ती व संपत्ती देवो.

भूक, तहान इत्यादी मलांनी युक्त अशा तुझ्या ज्येष्ठ भगिनीला म्हणजे अलक्ष्मीला मी नष्ट करतो हे देवी , अभाव व दारिद्र्य माझ्या घरातून घालवून टाक. सुगंधाने ओळखू येणारी , अपमानित होऊ न शकणारी , नेहमी पुष्ट , तसेच सुपीक व सर्व प्राणिमात्रांवर सत्ताअसणारी जी भूमिरूपी लक्ष्मी तिला मी आवाहन करतो. हे लक्ष्मी, आमच्या मनातील संकल्प व इच्छा पूर्ण होवोत. आम्ही सत्य भाषण करावे , आमचे पशु पुष्ट असावेत . आम्हाला अन्न भरपूर मिळावे व मला कीर्ती मिळावी. हे कर्दमा, तुझ्यामुळे लक्ष्मी वाढली आहे. तू माझ्या शेतात उत्पन्न हो. तसेच कमळांची माळ धारण करणारी संपदाही माझ्या कुळात वास करो. हे जलाशय स्नेह उत्पन्न करोत. हे चिक्लीत नामक लक्ष्मीपुत्रा , तुझ्यापासून होणारा लाभ मला मिळो व माझ्या कुळात लक्ष्मीदेवीचा वास असो.

हे अग्ने, दयाळू व कमळांची माळ धारण करणारी , पुष्करिणीत निवास करणारी , चंद्राप्रमाणे आल्हाद देणारी, पिंगट वर्णाची सुवर्णमय , पुष्ट अशा लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. हे अग्ने, सस्ययष्टी हाच जिच्या दंड, सुवर्णाच कांती असणारी , दयाळू, सोन्याच्या माळा परिधान केलेली , सूर्याप्रमाणे कांतिमान , सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी पाचारण कर. “

श्री म्हणजे ऐश्वर्य , सौंदर्य, संपत्ती, समृद्धी, कांती, लक्ष्मी, मांगल्य ! प्राचीनकाळीच श्री देवतेचे नंतर‘ लक्ष्मी ‘ देवतेमध्ये रूपांतर झाले. प्राचीनकाळी श्री देवता ही भूमी देवतेशी एकरूप असल्याने या भूमीदेवतेने धान्यनिर्मिती करून लक्ष्मीच्या रूपात आमच्या घरी कायम रहावे अशी प्रार्थना तळमळीने श्रीसूक्तात केलेली आहे. लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी होय.

श्रीसूक्तामध्ये धान्यलक्ष्मीची आणि तिच्या अनुषंगाने धनलक्ष्मीची इच्छा व्यक्त केलेली आहे. लक्ष्मीला कुठे राहणे आवडते ? तर नेहमीच लक्ष्मी प्रयत्नांच्या ठिकाणी , मेहनतीच्या- परिश्रमाच्या ठिकाणी राहणे पसंत करते. शेतात मेहनत करणा-याच्या घरी लक्ष्मीने रहावे. तेही कायम स्वरूपात रहावे. यासाठी मला घोडे, गायी, बैल आणि मदतनीस मिळाले पाहिजेत. माझे पशुधन आणि सहाय्यकर्ते पुष्ट असावेत. मी या सर्वांच्या मदतीने शेतात परिश्रम करीन. भूमीदेवीसाठी मी नांगरणी, पेरणी, लावणी अतिशय मेहनतीने करीन. शेतामध्ये कणसांनी भरलेली रोपे आणि त्यावर सकाळ संध्याकाळचे पडलेले सूर्याचे किरण पाहून धान्यलक्ष्मीने गळ्यात सोन्यारुप्याच्या माळा घातल्यासारखंच या श्रीसूक्ताच्या रचनाकर्त्यांना वाटते. शेतीसाठी योग्य पावसाची गरज नेहमीच असते. कर्दम म्हणजे चिखल आणि कर्दम म्हणजे शेतीतज्ज्ञ कर्दमऋषी ! या दोन्ही अर्थाने रचनाकर्ते ‘ कर्दमांना ‘ शेतात वास्तव्याला बोलावित आहेत. त्यामुळे धान्यलक्ष्मीसुद्धा सोन्यारुप्याच्या माळा गळ्यात घालून माझ्या शेतात येईल असे सांगत आहेत. कर्दम हे लक्ष्मीचे पुत्र ! त्यामुळे मुलाच्या ओढीने लक्ष्मी आपल्या घरी रहायला येईल असा विश्वासही प्रकट करीत आहेत.

ही लक्ष्मी ‘ अनपगामिनी ‘ म्हणजे कुठेही दूर न जाणारी असली पाहिजे अशी प्रार्थनाही ते करीत आहेत. विशेष म्हणजे ‘ मी सुराष्ट्रात राहणारा , म्हणून माझे सर्वच राष्ट्र धान्यलक्ष्मीने समृद्ध असावे ‘ अशी राष्ट्रसंपन्नतेची भावनाही श्रीसूक्तकर्ते इथे व्यक्त करीत आहेत.

श्रीलक्ष्मीसाठी प्रार्थना

लक्ष्मीच्या आगमनापूर्वी तिची भगिनी अलक्ष्मी ही घरातून बाहेर गेली पाहिजे. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य, क्रोध, अशांती, असमाधान, अस्वच्छता, आळस ! अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू हे शस्त्र आहे. म्हणून प्रथम अलक्ष्मीला म्हणजे या दुर्गुणांना बाहेर काढून त्यांना नष्ट करूया. नंतर ‘ श्री ‘ चे म्हणजे लक्ष्मीचे स्वागत करूया असे श्रीसूक्तात म्हटले आहे. लक्ष्मी जेथे शांतता, समृद्धी, समाधान, उद्योगीपणा आहे तेथे राहते. ही लक्ष्मी प्रसन्न, स्मित हास्यमुख, दयाळू, समाधानी आणि शांत आहे. धान्यलक्ष्मी घरात आल्यावर धनलक्ष्मी घरात येणारच असते. त्याचवेळी या धनलक्ष्मीबरोबर घरात प्रसन्नता, आनंद, समाधान, शांती यातच वास्तव्य असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड् रिपूंवर नियंत्रण असावे. परिश्रम करतांना मनातील दैन्य, दौर्बल्य नाहिसं होऊन मन समर्थ बनावे. शिवशंकराचा मित्र कुबेर रत्नांसह मला प्राप्त होवो. धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मीबरोबर कीर्तीलक्ष्मीही मला प्राप्त होवो. रचनाकर्ते उपासकांसाठी अशी प्रार्थना या श्रीसूक्तामध्ये सतत करीत आहेत.

श्रीसूक्त हे हजारो वर्षांपूर्वी वेदकाळात लिहिले गेले आहे. त्या काळातल्या कृषीसंस्कृतीचे दर्शन श्रीसूक्तामध्ये घडते. आजही पावसाअभावी भेगा पडलेल्या शेतजमिनी पाहिल्या की ‘ कर्दमा, तू माझ्या शेतात वास्तव्याला ये, ज्यामुळे माझे शेत धान्याने समृद्ध होईल ‘ ही श्रीसूक्तकर्त्याची तळमळीची प्रार्थना हजारो वर्षानंतरही आत्ताच्या काळाला लागू पडणारी आहे. नैसर्गिक आविष्कारातून धान्यलक्ष्मीची प्राप्ती जरी असली तरी मेहनत करण्याची वृत्ती तीच आहे. लक्ष्मीबरोबर प्रसन्नता, समाधान घरात यावे यातूनही आर्थिक व्यवहार समाधानाने व आनंदाने व्हावेत हाही फार नैतिक विचार श्रीसूक्तकर्त्यांनी ठसविला आहे हे विशेष आहे. आम्ही माणसेच नाही तर पशू व मदत करणारे सर्वच निरोगी पुष्ट असावेत असे विचार या सूक्तामध्ये मांडले आहेत. याबरोबरच कर्दमामुळे म्हणजे चिखलामुळे भूमी अपत्यवती होते. म्हणून मातृत्त्वाबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. त्या काळातील सामाजिक , सांस्कृतिक उच्च विचारांच्या संस्कृतीचे दर्शन श्रीसूक्तात आपल्याला दिसून येते.

श्रीसूक्तामध्ये सोळावी ऋचा फलश्रुतीची आहे. हे श्रीसूक्त भक्तीने, श्रद्धेने जो पठण करील त्यानी केलेल्या मेहनतीमुळे त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. या श्रीसूक्ताबरोबरच ‘ लक्ष्मीसूक्त ‘ फलश्रुतीम्हणून पठण करण्याची प्रथा आहे.’ सोन्यारूप्याच्या माळा घातलेली , कमळासारखी निर्मळ पवित्र, कमळामध्येच वास्तव्य करणारी लक्ष्मी मला प्राप्त होवो ‘ अशी भक्तांची इच्छा लक्ष्मीसूक्तात व्यक्त केली आहे. हे श्रीसूक्त पठण करतांना सूक्तकर्त्यांनी सांगितलेले दुर्गुण काढून टाकणे, सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, प्रामाणिकपणे मेहनत करणे आवश्यक आहे. या आधुनिक काळात केवळ सूक्त पठणाने लक्ष्मी प्राप्त होत नाही तर यशासाठी त्याबरोबरच योग्य दिशेने अथक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. श्रीसूक्त पठणामुळे मनोबल वाढते त्याचा उपयोग आपण कौशल्याने करून घेतला पाहिजे.

माणसाचा प्रथम स्वत:वर विश्वास असावयास हवा. मगच तो ईश्वरावर म्हणजेच सृष्टीत असलेल्या चैतन्यावर विश्वास ठेवू शकतो. भक्तीचा जास्त गाजावाजा न करता ती शांतपणे करीत राहिले तर मनोबल वाढते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. पायांचा आवाज न करता जो चालतो तो दूरपर्यंत चालू शकतो. कोणतीही उपासना रागावून, चिडून,आदळ आपट करीत करू नये. उपासना करीत असताना नेहमी चेहर्यावर हास्य, मनात समाधान आणि वाणीत नम्रता व माधुर्य असावे. केवळ उपासना माणसाला कोणतेही फळ देऊ शकत नाही. प्रथम आपण आपले काम मन लावून मेहनत घेऊन करावयास हवे. श्रद्धा आणि सबूरीने माणसाला अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. भाग्याची दारं ही सर्वत्र आहेत. जिद्दीने प्रामाणिक मेहनत करून उपासना करणा-याच्या मार्गात ती लागत असतात

उपासना निर्भयपणे करावी. जग हे भित्र्याला भिववते आणि भिवविणा-यास भीत असते. आपण आनंद आणि सुख देणा-या क्षणांची वाट पहात राहिलो तर कायमची वाटच पहात राहू. पण मिळालेला प्रत्येक क्षण हा जर आनंद आणि सुखात घालविला तर आपण कायमचे सुखात राहू. आपण समाजात पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते ती ही की, जी माणसे नेहमी यशस्वी होतात ती अडचणीतही संधी शोधत असतात. आणि जी माणसे नेहमी अयशस्वी होतात ती नेहमी संधी आली असता अडचणी सांगत बसणारी असतात. संधींचा आपण शोध घेतलाच पाहिजे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com